The Bicycle Thief

Language: Italian
Release Date: 1948
Directed By Vittorio De Sica!!
एक अत्यन्त मनस्वी, चिरतरुण आणि कालातीत कलाकृति ....
या चित्रपटाबाबत काही सांगणे न लागे. बिमल रॉय यांचा "दो बीघा जमीन" ज्याने पाहिला असेल त्यास या दोन्ही चित्रपटांतील सुसंगती चटकन ध्यानात येइल.
दुसऱ्या महायुधोत्तर काळात चढत्या मंदीने ऍंटोनिओ रिची आणि त्याच्या कुटुंबास जेरिस आणले असते. उत्पन्नाची साधने कमी आणि पदोपदी बेकारी. अशातच एक आशेचा किरण त्याला दिसतो जेंव्हा सरकारी एंप्लॉयमेंट एजन्सीकडून सिनेमा पोस्टर चिटकवण्याच्या कामास त्याची शिफारस होते. अट मात्र एकच, सायकल हवी. नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करावा की आता सायकल कोठून मिळवावी याची विवंचना करावी अशी द्विधा मन:स्थिति. अखेर पत्नीच्या मदतीने घरातला कपडा-लत्ता गहाण ठेउन नवी कोरी सायकल घरी येते आणि कित्येक दिवसांनंतर घरी एक उत्साहाचं वातावरण पसरतं. ऍंटोनिओचा पोरगा छोटा ब्रुनो फारच खूश असतो. सकाळी जेंव्हा बाप-लेक उत्साहाने घराबाहेर पडतात तेंव्हा त्यांना आणि आपल्यालाही पुसटशी शंका येत नाही की आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग त्यांच्यापुढे उभे ठाकणार आहेत.
त्यादिवशी ऍंटोनिओची सायकल चोरीस जाते आणि सुरु होतो जिवाचा आटापिटा करुन घेतला गेलेला शोधाचा प्रवास. ब्रुनो, ऍंटोनिओची वणवण आणि ग्रासून टाकणारी असहाय्यता. पण तरीही स्वत:चा आणि मुलाचा आत्मसन्मान जपण्यासाठी धडपडणारा, त्याच्यावर चिडणारा व नंतर समजूत घालणारा, मुलगा मध्येच हरवल्याचे समजुन वेडापिसा झालेला आणि अखेर स्वत:वरचे संस्कार विसरून परिस्थितिस शरण जाणारा बाप.
आयुष्याशी चार हात करण्याचा आणि त्यातून स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
