Sunday, May 31, 2009

Matrix


वाचोवस्की बंधु आणि मेट्रिक्स तत्त्व (वि) ज्ञान !!

'मेट्रिक्स' हा नक्की काय प्रकार आहे ?

काहींसाठी रहस्यमय विज्ञानकथा, स्पेशल इफेक्ट असलेला एक्शनपट तर काहींसाठी अत्यंत क्लिष्ट संगणकिय भाषा असलेला निव्वळ व्हिडियो गेम.
काहींना यात दिसला मानवतेचा गुलामगिरिविरुद्ध असलेला लढा तर कोणासाठी ही एक सरळ साधी प्रेमकथा.

चित्रपट पाहून काहीजण खरोखर भारावले तर काही कंटाळले. मी या भारावलेल्यांपैकी एक.

माझ्यासाठी होती ही आध्यात्मिक रूपककथा. सत्याच्या शोधात केली गेलेली धडपड.

चित्रपटाच्या पहिल्या भागात निओच्या हातात Jean Baudrillard लिखीत "simulacrum and simulation" नामक एक पुस्तक आहे ज्यावर चित्रपटाची पार्श्वभुमी बेतलेली आहे.
आधुनिक भान्डवलशाही युग स्वतःहुन कश्या प्रकारे एक अत्यंत क्लिष्ट आणि स्वयंप्रेरित यंत्रणा निर्माण करते की जेणेकरून मानव हा या यंत्रणेस मालक किंवा 'Source' न राहता केवळ 'Resource' वा साधन म्हणून उरतो.
असा हा मानवरुपी घटक या यंत्रणेपासून दूर न व्हावा यासाठी त्याच्याभोवती भ्रमाचे कृत्रिम जाळे (Fantasy Illusion) विणले जाते हेच ते मायाजाल वा मेट्रिक्स !!!

Simulacrum म्हणजे सरूपता जी प्रतिरूप हेच सत्य असल्याचा भ्रम उत्पन्न करते.
चित्रपटातच याबाबात प्रसंग आहे जेव्हा जेवणाच्या टेबलावर माउस नावाचा पोरगा इतरांना विचारतो, ज्या स्वादीष्ट पदार्थांचा मेट्रिक्स मध्ये आपण आस्वाद घेतो, कशावरून तोच स्वाद हा त्या पदार्थांचा खरा स्वाद मानावा? या यंत्राना काय माहीत खरे स्वाद? (मला या प्रसंगावरून उपनिषदांमधील नाचिकेत यम संवाद आठवला)

याच संकल्पनेचे सविस्तर विवेचन दुसऱ्या भागात नियो आणि निर्माता (Architect) यांच्या संभाषणात येतं.
नियो हा एक अवतार आणि त्या मागील प्रेरणा 'केओस थेअरी' (Chaos Theory) .

गीतेत कृष्ण म्हणतो,
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतिभारत
अभ्युत्थानमअधर्मस्य तदात्मानमसृजाम्यहम:।।
येथे सरळ अर्थ सांगायचा झाल्यास जेंव्हा धर्म (धारयति इति धर्म: या व्याख्येनुसार समाज किंवा सिविलायझेशन) ग्लानिर्भुत होईल म्हणजेच केओटिक स्थिति निर्माण होईल तेव्हां मी परत अवतार घेइन.

निर्मात्याने संबोधलेली यादृच्छिक Anomaly (Deviation from the Common Order) म्हणजेच नियो ही मेट्रिक्स च्या प्रत्येक आवृत्तित निर्माण होते. केओस थेअरी अनुसार ही एक Random प्रोसेस नसून Anomaly म्हणजेच अवताराचा जन्म हा पूर्वनियोजित आहे आणि यन्त्रणेच्या सुलभ कार्यक्षमतेसाठी अत्यावशक देखिल आहे.

निर्मात्याच्या म्हणण्यानुसार निओचे जग ही बहुदा तिसरी वा चवथी आवृत्ति असावी. (मेट्रिक्स हे विविध आवृत्त्यांच्या प्रायोगिकतेतुन साकार झालेले आहे). पहिली आवृत्ति ही Utopian समाजरचनेवर तर दूसरी Dystopian समाजरचनेवर आधारित होती. या दोन्ही रचना परस्पर विरोधी तरी Ideal असल्याने मानवाच्या अंत:प्रेरणेने नाकारल्या कारण मुळातच मानव Chaos मध्ये जगतो आणि हाच Chaos नवनिर्मितीस प्रेरणा देतो.

मला पहिल्या भागातील एक प्रसंग असाच सांगावासा वाटतो......
एजेंट स्मिथ बाजुला पडलेली एक खुर्ची ओढतो आणि मोर्फिअसकड़े रोखून पाहत त्याच्या समोरच बसतो. स्मिथच्या नजरेतून एकंदरीतच त्याला वाटणारी मनुष्य प्राण्याविषयीची घृणा आपणासही जाणवते. तो म्हणतो, "तुम्हा मनुष्यांबद्दल मला नेहमीच नवल वाटत आले. तुम्ही स्वतास सस्तन प्राणी समजता पण तुम्ही खरेच तसे आहात का? प्रत्येक सस्तन प्राणी हा आपल्या आसपासच्या निसर्गाशी समतोल साधून असतो. पण तुम्ही? तुम्ही स्थलांतर करता, तेथे स्वतहाची वंशाव वाढवता आणि तो परिसर स्वाह: करुन पुन्हा स्थलांतरास तैयार होता. तुम्हांशिवाय एकच सजीव अगदी असाच दिनक्रम साधतो तो म्हणजे विषाणु (Virus) ." एजेंट स्मिथ बोलायचा थांबुन प्रतिक्रियेची काही काळ वाट पाहतो व पुढे म्हणतो, "मानव हा कैंसर आहे, पृथ्वीला लागलेला एक रोग... आणि आम्ही... या रोगावरचे औषध ..."


अजुन खुप काही आहे जे मला येथे वेळेअभावी लिहिता आलेले नाही. प्रतिकांच्या आणि रुपकांच्या या खेळाचा अर्थ लावता लावता कदाचित एखादे पुस्तकच लिहून होइल. सिनेमाच्या अंती "आसतो मा सदगमय ॥ तमसो मा ज्योतिर्गमय ॥ मृत्योर्मामृतम् गमय ॥" या ओपेरा ने केलेला शेवट हा पाश्चात्यानी ज्ञानासाठी केलेला पुर्वेकडचा प्रवासच दर्शवतो.

0 comments: